दुकानवाड येथील आत्माराम म्हाडगुत यांचे आकस्मित निधन

कुडाळ:

कै.आत्माराम सिताराम तथा आबा म्हाडगुत यांच वयाच्या ८३ व्या वर्षी झालेल आकस्मिक निधन मनाला चटका आणि वेदना लावून जाणारे आहे. दुकानवाड पंचक्रोशीतील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आबा म्हाडगुत.आबा म्हणजे तीन पिढ्यांचे साक्षीदार. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंत पंचक्रोशीत घडलेल्या सर्व घटनांचे मौखिक पुरावे ऐकावेत ते आबांच्या वाणीतून. दिवसभरात कोण व्यक्ती कुणीकडे गेली याची माहिती हवी असेल तर त्याची चौकशी करावी ती आबांच्याकडे. दुकानवाड बाजारपेठेत एन्ट्री केली की पहिली नजर जायची ती खुर्चीवर बसलेल्या आबांच्याकडे. त्यांच्याकडे पाहिलं की ते ऐतिहासिक दुकानवाड बाजारपेठेचे सध्याच्या काळातील रखवालदारच वाटायचे. म्हणूनच कितीही महत्त्वाचं काम असलं तरी आबांना नमस्कार केल्याखेरीज पुढे पायच सरकत नव्हता .अनेक विषयावर त्यांच्याशी मारलेल्या गप्पा आठवत राहतील.माहिती आणि तंत्रज्ञानाने भारावलेल्या आजच्या पिढीला आबा म्हाडगुत तितके समजणार नाहीत. निरागस, निर्व्यसनी,संयमी , चिकित्सक, एखाद्याची आस्थेने विचारपूस करणारे,वर्तमानपत्राचे वाचक, सहकाराचे अभ्यासक अशा कितीतरी गुणांची एकत्रित गुंफण म्हणजे आबा म्हाडगुत होय. सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे त्या काळातील सच्चे भक्त अशी त्यांची ओळख होती. धरणग्रस्त नेते बाळ सावंत यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे टाळंबा धरणाच्या लढ्यातील प्रखर योद्धे तर सध्याच्या काळात श्री. विश्राम दळवी गुरुजी यांचे सर्वात जवळचे आणि विश्वासू मित्र. सामाजिक बांधिलकीचा वसा त्यांच्या घराण्यात कदाचित पूर्वांपार पासूनच नांदत असावा आणि नंतर ती जबाबदारी आबांनी आपल्या खांद्यावर घेतली असावी. म्हणूनच हळदीचे नेरूर गावचे सरपंच, सहकारी सोसायटीचे चेअरमन, नेरुर कर्याद नारूर पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य तसेच अनेक वर्ष संचालक ही पदे जनतेनेच त्यांना बहाल केली होती आणि आपल्या कामकाजाने त्यांनी आपली निवड सिद्ध केली होती. त्यांच्या अनपेक्षित जाण्याने केवळ दुकानवाड बाजारपेठेतीलच न्हवे तर पंचक्रोशीतील एक जुना जाणता वटवृक्षच कोडमडून पडला आहे. ब्रिटिशकालीन इतिहास असलेली दुकानवाड बाजारपेठ आज आबांच्या जाण्याने सुन्नी सुन्नी झाली आहे. आबा म्हाडगुत यांच्या बद्दल लिहिण्यासारखं खूप खूप आहे.आता येथून पुढे आबांच दर्शन दुकानवाड बाजारपेठेत होणार नाही ही खंत कायमची सतावत राहील. त्यांच्या आठवणी डोळ्या समोर सतत तरळत राहतील. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
श्री.एस.पी. कोराणे सर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top