संस्कार नॅशनल स्कूल निरवडेची शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक संपन्न..!

सावंतवाडी:
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही प्रक्रियेविषयी आदर निर्माण व्हावा या उद्देशाने आपल्या निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये नुकतीच शालेय विद्यार्थी परिषद निवडणूक उत्साहात व लोकशाही पद्धतीने संपन्न झाली. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मतदानासाठी पारंपारिक पद्धती ऐवजी मोबाईलवर आधारित ईव्हीएम (EVM) मशीन प्रणालीचा वापर करण्यात आला होता. शालेय स्तरावरील हा अभिनव प्रयोग विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय वेगळा आणि तंत्रस्नेही अनुभव ठरला.

या निवडणुकीसाठी शाळेतील विविध पदांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीनंतर उमेदवारांनी जोरदार प्रचार करत आपल्या सहकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शांततेत, शिस्तबद्ध आणि अत्यंत पारदर्शक वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. लोकशाहीच्या या उत्सवात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून मतदानाचा हक्क बजावला.

मतदान प्रक्रिया संपताच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तत्काळ मतमोजणी करण्यात आली आणि विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी विजयी उमेदवारांचे शाळेचे चेअरमन डॉ. शेखर जैन, मुख्याध्यापिका सौ. प्रणाली रेडकर आणि समन्वयक श्री. अजय बांदेकर यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ही निवडणूक यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षिका आणि विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शालेय प्रशासनाच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना आणि लोकशाही मूल्यांविषयी जागृती निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top