सावंतवाडी वन विभागातर्फे पर्यावरण सप्ताह उत्साहात..

स्वच्छता मोहिमेत ५० गोणी कचरा संकलित..

सावंतवाडी:
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या कार्यक्रमा दरम्यान उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी याबाबतची घोषणा केली. सावंतवाडीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी कचरा कुंड्याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. तर या दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात एकुण ५ हजार वृक्षलागवड केली जाणार असून यात नरक्या आणि वटवृक्षांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

सावंतवाडी वनविभागाच्या माध्यमातून आज येथील नरेंद्र डोंगरावर जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण प्रेमी डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, सह सचिव विनायक गावस, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार रुपेश हिराप, नागेश पाटील, भूवन नाईक, श्रीरंग सावंत, तनया रेडकर यांसह वनक्षेत्रपाल सुहास पाटील, वनपाल मिताली कुबल, प्रमोद राणे, वनरक्षक व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. यावेळी श्री शर्मा म्हणाले, दरवर्षी सिंधुदुर्ग वन विभागाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. यावर्षीही त्याच पद्धतीने नरेंद्र डोंगरावर स्वच्छता मोहीम व वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. नरेंद्र डोंगरावर मोठ्या प्रमाणात जमणारा प्लास्टिक कचरा अन् त्यामुळे होणारी पर्यावरणाची हानी पहाता प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना अंमलात आली. त्याची सुरुवात आज पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली. याचबरोबर वृक्षारोपणही करण्यात आले. यात प्राधान्याने दीड हजार वड आणि औषधी गुणधर्म असलेले साडेतीन हजार नरक्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे‌. टप्प्याटप्प्याने या १५ दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात ५ हजार झाडे लावण्यात येणार आहे. गतवर्षी सुरंगी या झाडाला महत्व देण्यात आले होते‌. त्या झाडांचीही जोपासना होत असून नागरिक, पर्यटकांनी नरेंद्र डोंगर व पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता जास्तीत जास्त प्लास्टिक वापर टाळावा तसेच कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचा वापर करावा असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, वनविभागाच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन पर्यटनावर भर दिला आहे. यात पारपोली, नरेंद्र डोंगर, आंबोली सारख्या ठिकाणी होम स्टे सारखी सुविधा आहे. या संदर्भात जनजागृती होण्याच्या दृष्टीने आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र डोंगर येथे पर्यटकांसाठी ‘वर्षा वन पर्यटन’ राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पर्यटकांना या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पर्यावरण प्रेमी डॉ. परूळेकर म्हणाले, नरेंद्र डोंगरावरील खासगी वन भागातून जमा झालेला कचरा हा आरसा दाखवणारा आहे. काही लोकांमुळे ही परिस्थिती होत असून त्यावर विचार करण आवश्यक आहे. तर वृक्षारोपण करतानाच पिढ्यान पिढ्या जपलेली आणि वाढलेली झाडे जपण्यासाठी सुद्धा वनविभागसह निसर्ग प्रेमींनी पुढाकार घ्यावा, ही झाडं आपली ‘आजी-आजोबा’ आहोत असं समजून त्यांना जपलं पाहिजे असंही आवाहन त्यांनी केले. वनविभागाच्या या कार्यक्रमात तब्बल ५० गोणी कचरा गोळा करत त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top