पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल अधिकारी अधिकृतरित्या उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी.

कुडाळ पंचायत समिती गटनेते योगेश धुरी यांची राज्याचे अप्पर सचिव विकास खारगे यांच्याकडे मागणी

कुडाळ प्रतिनिधी:
पंचायत समितीच्या मासिक सभेत विविध विभागांचे खातेप्रमुख नियमितपणे उपस्थित राहून लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करतात. मात्र महसूल अधिकारी अधिकृतरित्या या सभेत सहभागी होत नसल्याने महसूल विषयक अनेक प्रश्न प्रलंबित राहतात, अशी बाब कुडाळ पंचायत समिती गटनेते तथा माणगाव पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांनी राज्याचे महसूल अप्पर सचिव विकास खारगे यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी श्री. धुरी यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत महसूल विभागालाही अधिकृतरित्या उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. महसूल विभाग उपस्थित राहिल्यास शेतकरी व नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी, तक्रारी तसेच सूचना थेट मांडता येतील व त्यावर तत्काळ चर्चा होऊन मार्ग काढता येईल, असे त्यांनी सांगितले.

या मागणीची दखल घेत अप्पर सचिव श्री. विकास खारगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या संदर्भात काय करता येईल याचा अभ्यास करून लवकरच योग्य निर्णयाबाबत माहिती देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी श्री. धुरी यांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top