वनविभागाच्या RRT पथकाला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर यश
पिंगुळी प्रतिनिधी:
पिंगुळी येथे तलावात मगर पडल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने (RRT) घटनास्थळी धाव घेत मगरीच्या बचावकार्याला सुरुवात केली. तलाव खोल असून पाण्याची पातळी अधिक असल्याने मगर पकडण्याचे काम अत्यंत आव्हानात्मक बनले होते.
मगरीचा सुरक्षित बचाव करण्यासाठी तलावातील पाणी मड पंपच्या सहाय्याने कमी करण्यात आले. त्यानंतर पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले. मात्र, तलावाच्या एका बाजूने पाण्याचा प्रवाह सुरूच असल्याने तसेच तलावात मोठ्या प्रमाणात गाळ असल्यामुळे बचाव पथकाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
सलग दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर तसेच सुमारे पाच ते सहा तासांच्या कठीण बचाव मोहिमेनंतर अखेर RRT पथकाला मगर पकडण्यात यश आले. या बचावकार्यात पिंगुळी ग्रामस्थांनीही वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.
मगर पकडल्यानंतर तिची कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात आली. तपासणीत मगरीला कोणतीही इजा किंवा जखम झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर तिला सुरक्षितपणे तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही मा. उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलिंद शर्मा आणि मा. सहायक वनसंरक्षक सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी वनक्षेत्रपाल चेतन पाटील (कुडाळ), वनपाल सूर्यकांत सावंत (नेरूर), वनरक्षक समीर खरवत (नेरूर) आणि वनरक्षक सागर भोजने (तुळस) उपस्थित होते.
बचाव मोहिमेत जलद बचाव पथकातील अनिल गावडे, प्रसाद गावडे, वैभव अमृस्कर, सुशांत करंगुटकर, संतोष इब्रामपुरकर, यशवंत कदम आणि राहुल महेकर यांनी सहभाग घेतला.
अत्यंत कठीण, आव्हानात्मक आणि जोखमीच्या परिस्थितीतही वनविभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे मगरीची सुखरूप सुटका झाली. या यशस्वी बचाव मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
