कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या त्रुटींमुळे आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या अभावामुळे सर्वसामान्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी आता पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी गोव्याला धाव घ्यावी लागू नये, यासाठी आता दर तीन महिन्यांनी भव्य आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजचे डिन डॉ.अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे – इंगवले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील आदी उपस्थित होते.पुढे ना. नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा गंभीर रुग्णांना तातडीने गोवा (बांबोळी) येथे पाठवावे लागते. या प्रवासात होणारी ओढाताण आणि आर्थिक भुर्दंड थांबवण्यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे ही नवी आरोग्य मोहीम आखली आहे.जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था केवळ कागदोपत्री न सुधारता, ती प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ही पालकमंत्री ना. नितेश राणे यांची विशेष संकल्पना आहे. दर तीन महिन्यांनी नामांकित तज्ज्ञ डॉक्टर जिल्ह्यात आणून, त्यांच्या माध्यमातून रुग्णांना तपासणी आणि मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील. या सातत्यपूर्ण उपक्रमामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.शासकीय आरोग्य यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबवला जात आहे. जिल्ह्यातील रिक्त पदांचा प्रश्न सुटेपर्यंत अशा कॅम्पच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देणे हा उत्तम पर्याय आहे. जिल्हा रुग्णालय आणि आरोग्य विभाग या मोहिमेसाठी पूर्णतः सज्ज असून, जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत ही सेवा पोहोचवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
