सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून अनेक गावे अंधारात बुडाली आहेत. या गंभीर वीज संकटाची दखल घेत राज्य सरकार पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री कार्यालयाने आज तातडीने बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी सांगली, सातारा आणि बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके तातडीने सिंधुदुर्गात रवाना करण्यात आली आहेत. तसेच मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी राज्याच्या मेजर स्टोअरमधून आवश्यक ते ट्रान्सफॉर्मर आणि इतर साहित्य पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री कार्यालय व वीज वितरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाच्या या गतिमान उपाययोजनांमुळे वादळामुळे त्रस्त झालेल्या सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
