यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतून ‘फार्मा अन्वेषण’चे ९ विद्यार्थी राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र

राज्यस्तरीय स्पर्धेतील यश; ११ जुलै रोजी अहमदाबाद येथे होणार राष्ट्रीय अंतिम फेरी

सावंतवाडी प्रतिनिधी:

फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झालेले नऊ विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा ११ जुलै २०२६ रोजी अहमदाबाद येथील एल. एम. कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित करण्यात आली आहे.

प्रा. एम. एल. श्रॉफ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘फार्मा अन्वेषण’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र-गोवा विभागाची राज्यस्तरीय स्पर्धा यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे पार पडली. या स्पर्धेत निवड झालेले विद्यार्थी आता राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या उपक्रमासाठी महाराष्ट्र-गोवा विभागाचे मुख्य समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांना डॉ. रोहन बारसे, डॉ. तुषार रुकारी, प्रा. गौरी भिवशेट आणि प्रा. गायत्री आठलेकर यांनी मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे – साजन कांबळी, समीक्षा मेस्त्री, हर्षल सूर्यवंशी, सानिया शेख, अपूर्वा कामत, महादेव धुरी, श्रुती किल्लेदार, केतकी धणे आणि जुई पाटील. हे विद्यार्थी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी, विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, कणकवली, भारती विद्यापीठ,कोल्हापूर, इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, साडवली आणि गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे या महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होणाऱ्या सर्व १०८ विद्यार्थ्यांना मोफत नोंदणी, प्रवास व निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार आणि ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top