प्रलंबित नागरी समस्यांवर तातडीची कारवाई करा: ग्रामस्थांची मागणी..
सावंतवाडी:
येथील सर्वोदय नगर परिसरातील नागरी समस्यांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिला कमिटीने आज सावंतवाडी नगरपरिषदेवर धडक दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध नागरी समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांनी आपल्या तक्रारींचा पाढा मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यासमोर वाचला, त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
सर्वोदय नगर परिसरात गेल्या काही काळात पाणी आणि गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण होऊन दोन महिने उलटले तरी रस्त्यांची योग्य प्रकारे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. गेल्या वर्षीच दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खणून ठेवल्याने येथील रस्ते खड्डेमय झाले असून धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे श्वसनाचे त्रास आणि ॲलर्जीचे प्रमाण वाढले असून लहान मुले व ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, रस्त्यांच्या खडीकरणाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू होईल. तसेच नगरसेविका नीलम नाईक यांनी या प्रश्नी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांचे लक्ष वेधले असून स्थायी समितीची विशेष बैठकही बोलावण्यात आल्याचे सांगितले.
रस्त्यांसोबतच परिसरातील गटारांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. गटारांमध्ये माती आणि कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. पावसाळा तोंडावर असल्याने ही घाण वेळीच साफ न केल्यास आरोग्याचे संकट ओढवू शकते, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली. यासोबतच इंटरनेटच्या तारांचे अस्ताव्यस्त जाळे आणि चुकीच्या पद्धतीने बसवलेले स्पीड ब्रेकर यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या सर्व समस्या ३० एप्रिलपर्यंत सुटल्या नाहीत, तर १ मे रोजी शांततामय मार्गाने लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या भोंगळ कारभारावरही जोरदार ताशेरे ओढण्यात आले. गॅस बिलाच्या नावाखाली सर्वोदय नगरमधील एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीकडून बिल भरण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. नगरसेविका नीलम नाईक यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावत, शहरात सर्वात आधी सेवा सुरू होऊनही पेमेंटबाबत ग्राहकांना माहिती का दिली नाही, असा सवाल केला. मुख्याधिकाऱ्यांनी याप्रकरणी तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश गॅस कंपनीला दिले आहेत. या प्रसंगी गुरुदत्त कामत, दिशा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
