एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद’ उत्साहात

सिंधुदुर्गनगरी:
राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून एस.एस.पी.एम. अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘खेलो इंडिया युवा संवाद – खेल की बात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के साथ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन केले.कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे समन्वयक शुभम उपरिकर, कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेविका डॉ. सुप्रिया नलावडे, ‘माय भारत’ सिंधुदुर्गच्या कार्यक्रम पर्यवेक्षक अपेक्षा मांजरेकर, सरपंच विनायक गवस तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी प्रास्ताविकात मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करून ‘स्पोर्ट्स मिशन 2047’ ची संकल्पना मांडली. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, क्रीडा क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि देशाचे नाव उंचवावे, असे सांगितले. जिल्हा परिषदेमार्फत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मदतीची तसेच जिल्हा परिषदेच्या नवीन क्रीडा योजनेची माहिती त्यांनी दिली. सोशल मीडियाचा योग्य वापर करून त्याच्या आहारी न जाता विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रातून आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी कोल्हापूर युवा महाराष्ट्र केसरी तथा कुस्तीपटू ओमराज वायंगडे तसेच जिल्ह्यातील खेळाडू दीक्षा चव्हाण, भक्ती इंगळे, दिव्या मिस्त्री आणि कनिष्का नाईक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ‘माय भारत’ जिल्हा प्रतिनिधी जयराम जाधव, कु. फिजा मकानदार, महाविद्यालयीन सोशल मीडिया स्टार देव वाराणसे आणि दीपक मोर्जे यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘स्पोर्ट्स मिशन 2047’च्या माध्यमातून भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनविण्याच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. ‘खेलो इंडिया’ उपक्रमामुळे ग्रामीण व निमशहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. खेळामुळे तरुणांमध्ये शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. तनया पांचाळ यांनी केले, तर श्रीमती अपेक्षा मांजरेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top