बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव” पुस्तकाचे थाटात प्रकाशन

सावंतवाडी:
येथील ज्येष्ठ लेखक बाळकृष्ण राणे यांच्या “सुंदरवाडी मधाळ स्वप्नांचं गाव” या ललितलेखांच्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११.०० वा. श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते थाटात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत खेमसावंत भोसले राजेसाहेब होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सुधाकर ठाकूर आणि कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष दीपक पटेकर उपस्थित होते. व्यासपीठावर निवृत्त प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, प्रा. फातर्पेकर, प्रा. सुभाष गोवेकर, प्रा. गोडकर, जयप्रकाश सावंत, प्रा. शिंत्रे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस, लेखक बाळकृष्ण राणे, सौ. राणे, विनय सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजक १९८२ सायन्स बॅचच्या वतीने हेमंत झांट्ये, ॲड. गावकर, धरणे, सौ. सुखदा पेडणेकर, सौ. सुप्रिया गोडकर, सौ. अपर्णा झांट्ये, सौ. गीता धरणे, सौ. शैलजा शिरोडकर, सौ. संपदा देसाई, सौ. ऋग्वेदिता देसाई यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक करताना प्रा. गोडकर यांनी १९८२ सायन्स बॅचच्या कार्याचा आढावा घेताना गेले वर्षभर कोकणातील साहित्यिकांच्या घरी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी लेखक बाळकृष्ण राणे यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता सदरचा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. तसेच यापूर्वीचे त्यांचे पहिले पुस्तक सुद्धा १९८२ बॅचच्या वतीने प्रकाशित केल्याची आठवण देखील त्यांनी यावेळी सांगितली.

यावेळी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये दीपक पटेकर (दीपी) यांनी बाळकृष्ण राणे हे कोमसाप सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो असे सांगताना, ललित लेखन म्हणजे काय यावर प्रकाश टाकला. त्यांनी ललित मधील सौंदर्यस्थळे व शृंगार याबद्दल सखोल माहिती दिली आणि बाळकृष्ण राणे यांच्या पुस्तकाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष पदावरून बोलताना राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी राणेंच्या पुस्तकाचे कौतुक करून आपल्या कॉलेजमधील माजी विद्यार्थी अशाप्रकारे यश मिळवत असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच कॉलेजच्या रजिस्टरमध्ये अशा वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेल्या साहित्यिक आदींची नोंद घेतली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना डॉ. सुधाकर ठाकूर यांनी प्रथम ललित या विषयावर मार्गदर्शन केले आणि राणे यांच्या पुस्तकातील सावंतवाडीसह सावंतवाडीतील व्यक्तिचित्रणे व स्थळ यांची दिलेली माहिती हा एक महत्त्वाचा दस्तऐवज असून त्याचे पुस्तकाच्या माध्यमातून संवर्धन आणि जपणूक झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावरील निवृत्त प्रा. एम. व्ही. कुलकर्णी, प्रा. सुभाष गोवेकर आणि प्रा. फातर्पेकर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त करून लेखकाला शुभेच्छा दिल्या.

या दिमाखदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्यिक विनय सौदागर यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार प्रदीप पेडणेकर यांनी मानले. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला श्री. गोठोस्कर, अभय पंडित, प्रा. मर्गज, म्हसकर सर, अण्णा देसाई, सावंतबिर्जे, सुनील कोरगावकर, आरिफा शेख, संतोष मुंज, सुधीर शिरोडकर, नंदकुमार देसाई, अरुण देसाई यांच्यासह १९८२ बॅचचे विद्यार्थी आणि सुंदरवाडी ग्रुपचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रा. शिंदे, प्रा. निकुम, प्रा. पाटील, प्रा. धुरी, प्रा. एस. व्ही. पाटील आणि प्रा. काळे यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top