‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सिंधुदुर्गात विविध उपक्रमांचे होणार आयोजन

९ ते १७ ऑगस्टदरम्यान अभियान; नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. दि. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, यंदाचे अभियान ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या स्मरणार्थ समर्पित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अभियानाच्या कालावधीत शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तिरंगा फडकविणे, तिरंगा सजावट व रोषणाई, देशभक्तीपर कार्यक्रम, तिरंगा रॅली, सायकल व ई-बाईक रॅली, प्रदर्शन आदी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती, युवक मंडळे, क्रीडा संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी सहभाग घेऊन तिरंगा सायकल व ई-बाईक रॅली आयोजित करावी. रॅलीसाठी ऐतिहासिक स्थळे, स्वातंत्र्यसैनिक स्मारके व प्रमुख सार्वजनिक ठिकाणांचा समावेश करता येणार असून, वाहतूक व सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘तिरंगा सेल्फी’ हा अभियानातील महत्त्वाचा डिजिटल उपक्रम असून, नागरिकांनी HarGharTiranga.com या संकेतस्थळावर तिरंग्यासोबत सेल्फी अपलोड करून सहभाग नोंदवावा. तसेच शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये व सार्वजनिक ठिकाणी तिरंगा आणि ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित प्रदर्शने आयोजित करून जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अभियानाच्या निमित्ताने शासकीय इमारती, रुग्णालये, शाळा, प्रमुख चौक, रस्ते व अन्य सार्वजनिक ठिकाणी तिरंगी रोषणाई व सजावट करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. ‘वंदे मातरम्’च्या संकल्पनेवर आधारित तिरंगी रांगोळी काढून नागरिकांचा सहभाग वाढविण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

अभियानासाठी आवश्यक तिरंग्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी स्वयं-सहायता गट व स्थानिक विक्रेत्यांमार्फत तिरंगा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत. प्लास्टिक एवजी सर्व तिरंगे भारतीय ध्वज संहितेनुसार असणे आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, युवक, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था व विविध सामाजिक संघटनांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top