प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी सुनावणी
सिंधुदुर्ग:
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे, वाद व तक्रारी यांचा जलद व गतिमान पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत कुडाळ उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कुडाळ व मालवण तसेच कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी यांच्या महसूल न्यायालयात प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने व गतीने निपटारा करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक अपील प्रकरणे, तहसीलदार कुडाळ व मालवण यांच्या न्यायालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक चालू दावे, तसेच मंडळ अधिकारी स्तरावर सुनावणी सुरू असलेल्या तक्रारी व फेरफार नोंदी यांचा प्राधान्याने निपटारा करण्यात येणार आहे.
बुधवार, दि. ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ तहसीलदार कार्यालय, कुडाळ तसेच कुडाळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये संबंधित कार्यालयात प्रलंबित असलेल्या दावे, हरकती व अपील प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करण्यासाठी महसूल लोकअदालत घेण्यात येणार आहे.
तसेच गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय, मालवण तसेच मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये महसूल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडील मालवण तालुक्यातील प्रलंबित अपील व दावे यांचा तडजोडीने निपटारा करण्यात येणार आहे.
कुडाळ उपविभागातील सर्व संबंधित हितसंबंधित, पक्षकार, अर्जदार व नागरिकांनी आपल्या प्रलंबित महसुली प्रकरणांचा तडजोडीने निपटारा करून घेण्यासाठी आपले प्रकरण ज्या महसुली न्यायालयात प्रलंबित आहे, त्या संबंधित कार्यालयाशी विहित कालावधीत संपर्क साधावा आणि ‘महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानाचा’ जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे कुडाळ उपविभागाच्या दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
