नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचा संकल्प करत अभियान यशस्वी करू : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियाना’चा शुभारंभ

सिंधुदुर्ग:
शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सेवा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून हे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वी करू, असा विश्वास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केला. कुडाळ तहसीलदार कार्यालयात आयोजित सेवा संकल्प अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. तसेच पीक पाहणी आणि मतदार यादीतील दुरुस्ती या मोहिमांनाही नागरिकांनी पूर्वीप्रमाणे सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित शासकीय सेवा आणि योजनांची व्याप्ती वाढवून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणणे, प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढणे आणि विविध दाखले थेट जनतेच्या दारात पोहोचवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. हे विशेष ‘सेवा संकल्प अभियान’ १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले जात आहे.

या शुभारंभ कार्यक्रमाला तहसीलदार सचिन पाटील यांच्यासह कार्यालयातील प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविकात तहसीलदार सचिन पाटील यांनी कार्यालयाच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली. कुडाळ तहसील कार्यालयाने विहित मुदतीत तब्बल १३ हजार दाखल्यांचे यशस्वी वाटप केले असून, कोणताही वर्ग १ च्या जमिनीसाठी शासकीय नियमातील नवीन तरतुदी नुसार नजराना न घेता ३५ प्रकरणे तातडीने मार्गी लावली आहेत, असे त्यांनी सांगितले. येणाऱ्या अभियान कालावधीतही जनतेला विहित वेळेत विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देण्याचा ‘सेवा संकल्प’ प्रशासनाने केला असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते उपस्थित पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांचे थेट वाटप करण्यात आले. कोणत्याही त्रासाविना आवश्यक दाखले तात्काळ हातात मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, महसूल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top