कुडाळ:
माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा आक्रमक भूमिका घेतली असून, १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत दिपक जयराम काणेकर, मिलिंद रामा धुरी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात शासकीय जागेतील बेसुमार वृक्षतोड, स्थानिक शेतकऱ्यांना योग्य माहिती व प्रशिक्षण न देणे तसेच एकाच ठिकाणी अधिकारी दीर्घकाळ पदभारावर राहणे, यासह विविध गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
या प्रकरणाची यापूर्वी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर समिती नेमण्यात आली; मात्र समितीने या प्रकरणात पारदर्शक भूमिका घेतली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात आल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाहणीत २ ते ३ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. निळेली पशुपैदास क्षेत्राचे सुमारे ५०० एकर शासकीय क्षेत्र असल्याचे सांगत, संपूर्ण क्षेत्राची पाहणी केल्यास शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व प्रकरणाची खाते निहाय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कृषी विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणात कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.
या सर्व बाबींची योग्य चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ दीपक काणेकर मिलिंद धुरी, विनोद जाधव,नामदेव जानकर, सखाराम गावडे ,नकुल गवंडे,किशोर दळवी,विष्णू राणे वसंत दळवी,आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
