सर्व मिळून दुष्काळावर मात करूया; बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदतीला प्राधान्य

पालकमंत्री नितेश राणे यांचा दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा; जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारण्याचे निर्देश

प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून उपाययोजना कराव्यात

सिंधुदुर्ग:
जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने एकजुटीने काम करून मात करावी. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्यास प्राधान्य असून, जिल्ह्यातील प्रत्येक बाधित शेतकऱ्याला मदत मिळेल, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित दुष्काळसदृश परिस्थितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री राणे म्हणाले की, जिल्ह्यात यंदा पावसामध्ये मोठ्या प्रमाणात खंड पडला असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला आहे. त्यामुळे जिल्हा ‘ट्रिगर-१’मध्ये आला आहे. या परिस्थितीमुळे जनतेमध्ये अनावश्यक भीती निर्माण न करता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे हे आव्हान पेलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दिलासा देतानाच त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. ‘ट्रिगर-२’च्या अनुषंगाने आवश्यक असणारा अहवाल वस्तुनिष्ठ आणि परिस्थितीचे योग्य चित्र मांडणारा असावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पंचनाम्यांसाठी कृषी व संबंधित विभागांनी बांधावर जावे

बाधित शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी. पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्यासाठी कृषी विभागासह संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही सुरू करावी. शासनाच्या मदतीचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक माहिती अचूकपणे संकलित करावी, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

पाण्याचे योग्य नियोजन यापूर्वी केले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आतापासूनच जलव्यवस्थापनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही छतावरील पावसाचे पाणी संकलन करण्याच्या पर्यायांचा प्रभावी वापर करावा. शासन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे, हे प्रशासनाच्या कामातून नागरिकांना दिसले पाहिजे. ग्रामपंचायत स्तरावरील लोकप्रतिनिधींनीही प्रत्येक कामात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे उभारणार

भूजल पातळी वाढविण्यासाठी जिल्ह्यात दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कच्चे बंधारे उभारले जातात. यंदाची परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात जिल्ह्यात १० हजार कच्चे बंधारे लोकसहभागातून उभारण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. या कामात महाविद्यालयीन विद्यार्थी, स्काऊट-गाईड तसेच नागरिकांचा सहभाग घेऊन व्यापक मोहीम राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अस्तित्वात असलेले पक्के म्हणजेच सिमेंट बंधारेही सुस्थितीत आणण्याचे निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात सध्या ८२० पक्के बंधारे सुस्थितीत असून ३४७ बंधारे नादुरुस्त आहेत. नादुरुस्त बंधारे तातडीने वापरात आणण्यासाठी आवश्यक अंदाजपत्रके तयार करून कामांना गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. बंधारे बांधकाम, दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या भागात प्रभावी सनियंत्रण करावे, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

भूजल पातळीच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ संस्थेची मदत घ्या

जिल्ह्यातील भूजल पातळीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी सूचना आमदार निलेश राणे यांनी केली. तर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा तातडीने फेरआढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे पालकमंत्री यांनी सांगितले.

लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा आढाव्यात समावेश

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा सविस्तर आढावा सादरीकरणातून मांडला. जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची पद्धत, पेरणीची स्थिती, भूजल पातळी तसेच प्रमुख जलसाठ्यांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती यावेळी सादर करण्यात आली.

यावेळी आमदार दीपक केसरकर ऑनलाइन उपस्थित होते. त्यांनी जिल्ह्यात धडक बंधारा बांधकाम मोहीम राबविण्यासह पिण्याच्या पाण्याच्या बचतीबाबत जनजागृती करण्याची मागणी केली. आमदार निलेश राणे यांनी बाधित शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणी येऊ नयेत, सरसकट मदत मिळावी यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याची सूचना केली.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रभाकर सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. उपस्थित लोकप्रतिनिधींनी दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना व सूचना मांडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top