पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती: जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी भरारी, फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा आठवड्याचे सातही दिवस
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आणि आर्थिक समृद्धीला नवी दिशा देणारी महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केली आहे. येत्या १६ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग (चिपी) ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा सुरू होत असून, ही सेवा आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्रासह रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विमानतळासमोरील रस्ते, वीजपुरवठा, नाईट लँडिंग यांसारख्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका घेऊन पाठपुरावा केला. विमानतळ आर्थिकदृष्ट्या सक्षम राहावे आणि विमानसेवा कायमस्वरूपी सुरू राहावी, यासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग (व्हीजीएफ) मिळविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे सिंधुदुर्ग विमानतळासाठी व्हीजीएफ उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आता मोठ्या विमान कंपन्यांनाही या विमानतळावर सेवा सुरू करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.१६ नोव्हेंबरला केवळ विमानाचे टेकऑफ होणार नाही, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला खऱ्या अर्थाने नवी भरारी मिळणार आहे. चला, आपण सर्वांनी मिळून रोजगाराच्या नव्या संधींसाठी होऊया आणि विकसित सिंधुदुर्ग घडविण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहन ना. नितेश राणे यांनी केले.
