शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी अचूक माहिती महत्त्वाची

नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी वेळेत शासनापर्यंत पोहोचवा; पालकमंत्री नितेश राणे यांचे होडावाडा येथे निर्देश

वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री नितेश राणे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी संवाद

सिंधुदुर्ग:
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी शेतीच्या नुकसानीची अचूक आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती वेळेत शासनापर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने नुकसानीचे अचूक पंचनामे करून ही माहिती शासनाला सादर करावी आणि शासनाच्या सवलती व मदत पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

वेंगुर्ला तालुक्यातील होडावाडा येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेल्या भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. सरपंच रसिका केळुसकर, प्रगतशील शेतकरी विजय होडवडेकर तसेच परिसरातील शेतकऱ्यांशी त्यांनी थेट संवाद साधून पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि शेतीच्या नुकसानीबाबत माहिती घेतली. हवामानातील बदल आणि अपुऱ्या पावसामुळे भात पिकावर झालेला परिणाम याची त्यांनी गांभीर्याने पाहणी केली.

यावेळी मागील वर्षीची आणि यंदाच्या वर्षातील पाऊस, शेतीची स्थिती तसेच विहिरींमधील पाणीपातळी याबाबत पालकमंत्र्यांनी तुलनात्मक माहिती जाणून घेतली. परिसरातील विहिरींची पाणीपातळी तपासतानाच ओवाळवरील बंधाऱ्याचीही पाहणी करण्यात आली. पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हामुळे भात पीक करपल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक

“पडलेल्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून ते अडविणे आणि जमिनीत मुरविणे आवश्यक आहे. यापुढे पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन गावपातळीवर जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे,” असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले. ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक परिस्थितीनुसार लहान बंधारे उभारण्याबाबत तसेच ग्रामस्थांमध्ये पाणी बचत आणि जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणे हा या पाहणी दौऱ्याचा उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जमिनीची, पिकांची आणि पाण्याची सद्यस्थिती प्रत्यक्ष समजून घेतल्यास शासनाकडे मदतीसाठी आवश्यक माहिती अधिक अचूकपणे मांडता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाकडून मदतीसाठी प्रयत्न

शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळेल; मात्र त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसानीची अचूक माहिती आणि आकडेवारी प्रशासनाने वेळेत शासनापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. शासनाने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ पात्र शेतकऱ्यांना वेळेत मिळावा, यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह संबंधित खाते प्रमुख व स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top