सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या सावंतवाडी शाखेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार आणि स्नेहमेळावा नुकताच सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ व निवृत्त नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना विजय चव्हाण यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनी आता पुढील उच्च शिक्षण घेऊन एमपीएससी व यूपीएससी परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनावे, असे आवाहन केले. तरुणांनी उच्च पदांवर जाऊन समाजाची मान वाढवावी आणि समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करावेत, आमची कौतुकाची थाप कायम त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष आणि मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आपल्या भाषणात जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांच्या कामाचा गौरव केला. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा डेटा गोळा करण्याचे काम जिल्हाध्यक्ष व सचिवांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले असून, प्रसंगी मुंबईतील आझाद मैदानावर जाऊन त्यांनी समाजाचे प्रतिनिधित्व केले आणि समाज नेतृत्व जिवंत असल्याचे दाखवून दिले, अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले. पुढे बोलताना ॲड. निरवडेकर यांनी एक मोठी घोषणा केली. सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून समाजमंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ‘लाईफटाईम प्रोव्हिजन’ म्हणजेच कायमस्वरूपी आर्थिक तरतूद करण्यात आली असून, आता कार्यक्रमांसाठी कोणाकडेही हात पसरण्याची गरज उरलेली नाही, असा दिलासा त्यांनी समाजबांधवांना दिला.
या सोहळ्याला जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओटवणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधीर जाधव, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, नामदेव चव्हाण, नरसू रेडकर, ऋषिकेश चव्हाण, स्वप्नील चव्हाण, जिल्हा समन्वयक बाबुराव चव्हाण, लवू चव्हाण, दिलीप इन्सुलकर, माजी तालुकाध्यक्ष गणेश म्हापणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर तळकटकर, तालुका सचिव जगदीश चव्हाण, निवृत्त उपशिक्षणाधिकारी परशुराम चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश तिवरेकर, लक्ष्मण आरोसकर, संजना चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, विजय ओटवणेकर, सुधाकर बांदेकर, शांताराम पवार, एकनाथ चव्हाण, संभाजी कांबळे, नरेश कारिवडेकर व कल्याण कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका सचिव जगदीश चव्हाण यांनी हा कार्यक्रम समाजबांधवांच्या दातृत्वावर आणि आर्थिक देणगीच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडल्याचे नमूद करत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सौ. संजना चव्हाण यांनी केले.
