जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा

अखर्चित निधी तातडीने खर्च करून विकासकामे पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या सूचना

सिंधुदुर्गनगरी:
आगामी जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुनीती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ तसेच विविध योजनांअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ अंतर्गत मंजूर योजनांच्या अंमलबजावणीचा योजनानिहाय आढावा घेतला. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी उपलब्ध अखर्चित निधी तात्काळ खर्च करून मंजूर विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच ज्या कामांची निविदा प्रक्रिया प्रलंबित आहे, ती तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
विकासकामांची अंमलबजावणी करताना गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सर्व विभागप्रमुखांना कामांच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच विविध योजनांअंतर्गत आवश्यक असलेले दायित्व निधी मागणी प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांमधील खर्चाचा आढावा घेण्यात आला. या योजनांतील अखर्चित निधी तातडीने खर्च करून अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना देण्यात आले.
यावेळी सिंधुरत्न समृद्ध योजना अंतर्गत दायित्व निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत तसेच सिंधुरत्न समृद्ध योजना २.० अंतर्गत प्रस्तावित कामांचे आराखडे निर्धारित मुदतीत सादर करावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांना दिल्या.
बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top