योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ

विकसित भारत – जी-राम-जी’ या योजनेमुळे ग्रामीण विकासाला मिळणार चालना:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्गनगरी:
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) हि दि. 30 जून 2026 रोजी निरसित होऊन दि. 01 जुलै 2026 रोजी पासून विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) ही योजना सुरु झालेली आहे. विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) या योजनेमुळे ग्रामीण विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यासाठी ग्रामीण भागात योजनेची जनजागृती करण्यासह या अंतर्गत फळबाग लागवड, बांबू लागवड कामावर भर देणे बाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी सांगितले.
विकसित भारत -रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय जनसंमेलन व कामांचा शुभारंभ कार्यक्रम मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे दि. 2 जुलै 2026 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन राउत, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती कोळेकर, गटविकास अधिकारी नरेगा श्री. पाटील तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी / कर्मचारी , लाभार्थी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी VBGRAMG योजनेत सुरु करण्यात येणाऱ्या कामांचे जिल्ह्यातील 4 लाभार्थ्यांना कार्यारंभ आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रदान करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
रोजगार हमी बाबतची पार्श्वभूमी, वि. स. पागे यांनी सुरुवात केलेल्या योजनेचा आज झालेला विस्तार विषद करण्यात आला. नागरिकांचे ग्रामीण भागातील स्थलांतरण थांबविणे आणि त्यांना ग्रामीण भागातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. या योजनेतून ग्रामीण भागात जलसुरक्षा व जलसंधारणाची कामे, मूलभूत ग्रामीण पायभूत सुविधा, उपजीविका आधारित पायभूत सुविधा आणि आपत्ती प्रतिबंधक कामांवर या योजनेत भर देण्यात येणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागात सुविधा निर्मितीला चालना मिळणार आहे. सामाजिक मत्ता निर्माण करणे, जीवनमान उंचावणे, अकुशल कामांची हमी व नवीन कामाअंतर्गत झालेले बदल आधुनिक तंत्रज्ञानचा वापर, सुधारणा या बाबत माहिती देऊन ग्रामीण भागाच्या विकासाला नवी दिशा देणारी ही योजना अधिकाधिक प्रभावीपणे राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेअंतर्गत राज्याला आदर्श असे काम करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, असे उपजिल्हाधिकारी रोहयो नितीन राउत यांनी आवाहन केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत आतापर्यंत 80 हजार 796 कामे सुरु करून त्यापैकी 68 हजार 951 कामे पूर्ण झालेली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात 7.95 लक्ष मनुष्यदिवस निर्मिती झालेली असून 33 कोटी खर्च झालेला आहे.
यापूर्वी मनरेगा योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगले काम झाले. फळबाग लागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, गुरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, शेळी शेड, घरकुल या प्रकारची कामे झाली आहेत. यातील एकूण 16 लाभार्थ्यांच्या यशोगाथा सादरीकरण करण्यात आल्या. यावेळी योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी योजनेमुळे जीवनमानात झालेला बदल, आर्थिक स्थेर्य , सुधारणा याबाबत मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेऊन आपली प्रगती करण्याबाबत आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top