व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय

कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार..!

कणकवली प्रतिनिधी:
पत्रकारांचे न्याय हक्क, हक्काचे घर, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे आरोग्य आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण या पंचसूत्री धोरणावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (१६ ऑगस्ट २०२६) कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. जिल्हाध्यक्ष शैलेश मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जिल्ह्यातील संघटनात्मक विस्तारासह पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित पदाधिकारी व सदस्यांचे सदस्यत्व फॉर्म भरून घेण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाधिक पत्रकारांना संघटनेशी जोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
संघटनेच्या पंचसूत्री धोरणानुसार पत्रकारांना हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा, कुटुंबाच्या आरोग्यासाठी विविध लाभ तसेच पत्रकारिता क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ठोस नियोजन करण्यावर बैठकीत एकमत झाले.
नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार
नुकताच परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमात पदभार स्वीकारलेल्या सिंधुदुर्गातील नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. राज्य सह-संघटक समीर महाडेश्वर, राज्य खजिनदार परेश राऊत आणि राज्य कोर कमिटी सदस्य जय भोसले यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी राज्य सह-संघटक समीर महाडेश्वर यांनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या पंचसूत्री धोरणाची सविस्तर माहिती देत संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्य खजिनदार परेश राऊत यांनी जिल्हा संघटना अधिक सक्षम करण्यासाठी राज्य पातळीवरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. तर राज्य कोर कमिटी सदस्य जय भोसले यांनी संघटनेतील नवीन बदल, आगामी कार्यपद्धती आणि नियमावलीबाबत उपस्थित पदाधिकारी व सदस्यांना मार्गदर्शन केले.

प्रदेशाध्यक्षांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद
या बैठकीदरम्यान महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडीया यांनी व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. त्यांनी संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचे कौतुक केले. पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटनेने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त करत जिल्हा कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
जिल्ह्यात संघटना विस्ताराला प्राधान्य
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेची भक्कम बांधणी करून जास्तीत जास्त पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आवाज उठविण्यासोबतच पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी उपलब्ध होणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
या बैठकीला जिल्हा सरचिटणीस अमित पालव, उत्तर विभाग जिल्हाध्यक्ष विष्णू धावडे, कार्याध्यक्ष मिलिंद धुरी, खजिनदार आनंद कांडरकर, उपाध्यक्ष सुयोग पंडित, उपाध्यक्ष राजा दळवी, सदस्य विराज बावकर, संघटक नयनेश गावडे, जिल्हा सदस्य रणजित जाधव, रेवती वालावलकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यश माधव, कुडाळ तालुकाध्यक्ष देवेंद्र गावडे, कुडाळ कार्याध्यक्ष राजेश हेदळकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा, पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम आणि आधुनिक पत्रकारितेसाठी प्रशिक्षण या माध्यमातून ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गातील वाटचाल अधिक गतिमान करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top