पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन…
माजी मुख्यमंत्री खास नारायण राणेंचे स्वप्न पूर्ण…
सिंधुदुर्ग:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर आज पुन्हा सुरू झाली. या विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केक कापून आनंदोत्सव साजरा केला. तसेच मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला त्यांच्या हस्ते बोर्डिंग पासचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. सुरू झालेली ही विमानसेवा भविष्यात कधीही बंद पडणार नाही, अशी ठाम ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर फ्लाय ९१ कंपनीच्या विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार नीलेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अपूर्वा बासूर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती संतोष साठविलकर, प्रितेश राऊळ अनुराधा नारकर, रोहिता तांबे, प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, दीपलक्ष्मी पडते,अबीद नाईक, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप, आनंद शिरवलकर, मनोज रावराणे, आदी सह असंख्य भाजपा सेना कार्यकर्ते पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
