सावंतवाडी प्रतिनिधी:
सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध मोती तलावात शनिवारी दुपारी घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली. तलावात उडी घेतलेल्या एका युवकाचा मृतदेह सापडला असून, एका युवतीनेही तलावात उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. युवकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, युवतीचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
घटनास्थळी दप्तर, मोबाईल, इयरबड आणि वॉलेट आढळून आल्याने पोलिसांनी ही सामग्री ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. दोन्ही घटना एकमेकांशी संबंधित आहेत का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती शहरात पसरताच मोती तलाव परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांकडून पंचनामा करून पुढील तपास सुरू असून, तपासानंतरच घटनेमागील नेमके कारण आणि संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
मोती तलावातील या घटनेने सावंतवाडी शहरात चिंता आणि हळहळ व्यक्त होत आहे.
