कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे आयोजन..
सावंतवाडी प्रतिनिधी
कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष कवी दीपक पटेकर दीपी यांचा पहिलाच वृत्तबद्ध काव्यसंग्रह “बकुळीची फुले” चा प्रकाशन सोहळा सावंतवाडीतील प्रसिद्ध केशवसुत कट्ट्यावर रविवार दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.४५ वा. पार पडणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा आयोजित या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी शिवाजी विद्यापीठ सिनेटचे माजी सदस्य, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. एच. व्ही. देशपांडे, कोल्हापूर (आजरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य), तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मालवणी कवी विनय सौदागर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ.जी. ए. बुवा, साहित्यिका सौ.उषा परब, कोमसापचे जिल्हाध्यक्ष श्री.मंगेश मसके यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कवी दीपक पटेकर यांचा विविध वृत्तातील ६० वृत्तबद्ध कवितांचा समावेश असलेला बकुळीची फुले हा पहिलाच काव्यसंग्रह आहे. अनेक वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंकातून त्यांच्या कविता, ललित लेख, सामाजिक विषयावरील लेख, कथा प्रसिद्ध झाल्या असून त्यांनी आतापर्यंत पाचशेहून जास्त मराठी, हिंदी कविता आणि शंभरहून जास्त ललित लेख, कथा, सामाजिक लेख लिहिले आहेत. गेली पाच वर्षे संवाद दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक म्हणून देखील ते संपादन करत आहेत. अलीकडेच सातारा येथे पार पडलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्ट्यावर त्यांनी कविता सादर केली होती. अनेक राज्यस्तरीय काव्य संमेलनात देखील त्यांचा सहभाग असतो.
सावंतवाडी येथील केशवसुत कट्टा, तुतारी जवळ होणाऱ्या या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास सर्व साहित्य रसिकांनी, मित्रमंडळींनी उपस्थित रहावे असे आवाहन कवी दीपक पटेकर यांच्यासह कोमसापच्या पुस्तक प्रकाशन आयोजन समितीचे सदस्य राजू तावडे, मराठी साहित्य संस्कृती मंडळ सदस्य भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, अभिमन्यू लोंढे, ॲड. नकुल पार्सेकर, विनायक गांवस, प्रा. रुपेश पाटील आदींनी केले आहे.
