सावंतवाडी:
त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रसन्न चांदण्यात सुरांच्या मधुर लहरींनी आसमंत भारून टाकण्याची संगीतमय पर्वणी सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळणार आहे. श्री सद्गुरू संगीत, कला व सांस्कृतिक मंडळ आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे चांदणे फुलांनी…’ या हिंदी-मराठी सदाबहार गीतांच्या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीत सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून, मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वाजता जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी (सावंतवाडी गार्डन) येथे हा सुरेल कार्यक्रम रंगणार आहे.
जुन्या आठवणींना उजाळा देणारी सुरांची मैफल!
संगीतप्रेमींच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या हिंदी-मराठी चित्रपटगीतांचा सदाबहार नजराणा या मैफलीतून सादर होणार आहे. विविध नामवंत गायकांच्या सुरेल आवाजातून रसिकांना जुन्या गाण्यांच्या भावविश्वात रमण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती व संकल्पना निलेश मेस्त्री यांची आहे. गायक कलाकार म्हणून नितीन धामापूरकर, भास्कर मेस्त्री, हेमंत गोडकर, सर्वेश राऊळ, सिद्धी परब, वर्षा धामापूरकर, समृद्धी सावंत, केतकी सावंत, अनामिका मेस्त्री, पूजा ढळवी, मानसी वडे, सानिका सासोलकर, चिन्मयी मेस्त्री आणि अलिशा मेस्त्री हे कलाकार आपल्या सुरेल गायनाने रंगत आणणार आहेत.
वाद्यसंगती आणि संगीत संयोजनाचीही मेजवानी!
मैफलीला निलेश मेस्त्री (संवादिनी), मंगेश मेस्त्री (सिंथेसायझर), किशोर सावंत, निरज मिलिंद भोसले, सिद्धेश सावंत (तबला), अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), संजय कानडे (निवेदन), सुभाष शिरोडकर (ध्वनी संयोजन) आणि दुर्वा सावंत (गिटार) यांची साथ लाभणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या सावंतवाडीच्या निसर्गरम्य वातावरणात जुन्या गीतांची सुरेल बरसात अनुभवण्याची ही संधी रसिकांसाठी निश्चितच अविस्मरणीय ठरणार आहे. संगीत, स्वर आणि आठवणींच्या संगमातून साकार होणाऱ्या या कार्यक्रमाला सावंतवाडीतील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
