कुडाळमध्ये सुवर्णकारच्या दुकानांमध्ये बिबट्याची नखे आणि दातांसह लाखाचा मुद्देमाल जप्त..
कुडाळ प्रतिनिधी:
सिंधुदुर्गातील कुडाळ बाजारपेठेतील एका सुवर्णकाराच्या दुकानावर वनविभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. काल मंगळवारी सायंकाळी कुडाळ व सावंतवाडी वनविभागाने संयुक्तरित्या केलेल्या या कारवाईत बिबट्याची ६ नखे, २ सुळे, २० नखांचे अवयव तसेच वन्यप्राण्यांच्या शिंगांपासून तयार केलेले ६ अवयव असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयित दुकानमालकाला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सावंतवाडी व कुडाळ वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेले अवयव हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत संरक्षित असलेल्या बिबट्याचे असल्याचे वनविभागाने सांगितले आहे. उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी नागरिकांना वन्यजीवांच्या अवयवांची खरेदी-विक्री किंवा तस्करीची माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे
