घावनळेकाटा बॉक्सेलजवळ महामार्गावरील धोकादायक ठिकाणी उपाययोजनांना सुरुवात
कुडाळ प्रतिनिधी:
घावनळेकाटा बॉक्सेलजवळ
मुंबई-गोवा महामार्गावर पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे वारंवार अपघात होत असल्याने पावशीचे माजी सरपंच श्रीपाद (पप्या) तवटे यांनी प्रशासनाला दिलेल्या जनआंदोलनाच्या इशाऱ्याची तात्काळ दखल घेण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून पप्या तवटे यांनी या गंभीर समस्येची माहिती दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.
कुडाळहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोला रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे अपघात होऊन एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या ठिकाणी पावसाळ्यात वारंवार पाणी साचत असल्याने तसेच रस्त्याच्या तांत्रिक त्रुटींमुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन वर्षांत या ठिकाणी ४० हून अधिक अपघात घडल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या गंभीर प्रकाराची दखल घेत पप्या तवटे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तातडीने या ठिकाणाची पाहणी करून
अपघातांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली होती. तसेच, आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास पावशी ग्रामस्थांच्या वतीने महामार्गावर जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, पप्या तवटे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधून घावनळेकाटा बॉक्सेलजवळील परिस्थितीची माहिती दिली. पालकमंत्र्यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत प्रशासनाला आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून धोकादायक ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली असून, महामार्गावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासह रस्त्याच्या तांत्रिक समस्यांवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे.
पप्या तवटे यांच्या पाठपुराव्याला आणि प्रशासनाच्या तातडीच्या कार्यवाहीला स्थानिक ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर न थांबता या ठिकाणी भविष्यात अपघात होणार नाहीत, यासाठी कायमस्वरूपी आणि शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
घावनळेकाटा बॉक्सेलजवळ महामार्गावरील धोकादायक ठिकाणी उपाययोजनांना सुरुवात
