आडाळी एमआयडीसीत १०० कोटींची गुंतवणूक;तरुणांना मिळणार रोजगार

आमदार दीपक केसरकर यांची घोषणा

सावंतवाडी:
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी माझे मित्र आणि उद्योजक सुनील पैकाणे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून डाटा एन्ट्री कंटेनर तयार करण्याचा कारखाना सुरू करत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मला दिलेली ही विशेष भेट आहे, अशी माहिती माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या पत्रकार परिषदेला ‘क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे मालक सुनील पैकाणे आणि संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.
आमदार केसरकर पुढे म्हणाले की, पैकाणे यांनी २०१० मध्ये बांदा-वाफोली येथे कंपनी सुरू केली होती. या कंपनीत सध्या ७०० स्थानिक युवक कार्यरत आहेत. आता ‘क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी कंटेनर डाटा एन्ट्री प्रकल्पाद्वारे आडाळी एमआयडीसीमध्ये १०० कोटींची नवीन गुंतवणूक करत आहे. या उद्योगासाठी एमआयडीसीमध्ये ६ एकर जमीन उपलब्ध करून देण्याबाबत उद्या मुंबईत उद्योग मंत्र्यांशी बैठक होणार आहे. या प्रकल्पामुळे आगामी काळात परिसरातील शेकडो तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. तसेच, आडाळी एमआयडीसीत दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी उपलब्ध राहतील आणि या क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योग आणून स्थानिकांना रोजगार देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उद्योजक सुनील पैकाणे म्हणाले की, जागेचा ताबा मिळाल्यानंतर पुढील सहा ते आठ महिन्यांत उत्पादन सुरू केले जाईल. कंपनीत किमान दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. आम्ही जेथे प्रकल्प उभारतो, तेथील स्थानिक तरुणांना रोजगारात प्रथम प्राधान्य देतो. वाफोली येथे आमचे चार कारखाने असून, आणखी जागा उपलब्ध झाल्यास तेथे नवीन कारखाने उभारण्याची तयारी आहे.
राजकीय व विकासकामांचा आढावा:
पत्रकार परिषदेत आमदार केसरकर यांनी राजकीय आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहताना ते म्हणाले की, अजित पवारांशी माझे घनिष्ठ संबंध होते आणि त्यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला मिळाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हे नाते जोपासले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना केसरकर यांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे आपले संबंध घट्ट असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यावर सेनेला कॅबिनेट मंत्रीपद देत आपली दोन्ही खाती इतर कोणाकडे जाऊ दिली नव्हती, याची आठवणही त्यांनी काढली.
यासोबतच, सावंतवाडीत बीओटी (BOT) तत्त्वावर ‘बस पोर्ट’ उभारणीस परिवहन मंत्र्यांनी ग्वाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले. तळवणे येथे बोट निर्माण करण्याचा कारखाना मंजूर केल्याबद्दल त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले. सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून काम सुरू असून, तिलारी येथे ॲम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्ट्स आणि ॲनिमल सेंटर उभारण्याचा प्रयत्न आहे.
शक्तिपीठ महामार्ग रेडीला जोडण्यासह मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस हायवेला शक्तीपीठ जोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे केसरकर यांनी नमूद केले. आंबोलीत गोल्फ कोर्स आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे माझे ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यावर भर राहील. याशिवाय सावंतवाडीत पर्यटन विकासासोबतच शिर्डीच्या धर्तीवर साई मंदिर उभारण्याचा मानस असून, वडील वसंतशेठ केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून गरजूंना मदत करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top