घोडगे-सोनवडे घाट मार्गासाठी यशस्वी पाठपुरावा कुडाळ मालवणच्या विकासाला मिळणार नवी दिशा
कुडाळ प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने धडपडणारे नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या रूपाने कुडाळ-मालवण मतदारसंघाला मिळाले, याचा कार्यकर्ता म्हणूनच नव्हे तर एक सिंधुदुर्गकर म्हणून सार्थ अभिमान वाटतो, अशी भावना जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसह पर्यटकांच्या दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या घोटगे-सोनवडे घाटमार्गासाठी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळत असल्याचे पाहून विशेष समाधान वाटते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार असल्याचे कानडे यांनी सांगितले.
आमदारपद केवळ पद मिरविण्यासाठी नसून विकासकामे मार्गी लावणे आणि जनतेचे प्रश्न जाणून त्यांना न्याय देणे ही जबाबदारी आहे. हे गमक आमदार निलेश राणे यांनी ओळखून त्यादृष्टीने प्रभावी वाटचाल सुरू केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज समस्या, आंबा-काजू नुकसानभरपाई, विमा रक्कम, हळदीचे नेरूर येथील पूल, घावनळे-नानेली जोडणारा पूल, झाराप तिठा ते माणगाव रस्ता व त्यावरील पूल, साळगाव माऊली मंदिर रस्ता व मोठा पूल, माणगाव तिठा ते नाणेली, माणगाव तिठा ते माणगाव हायस्कूल सोनार साखळी रोड पूळास येथील घरकुलांचा प्रश्न, मच्छीमार बांधवांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न तसेच दुर्लक्षित राहिलेल्या दशावतार कलेशी संबंधित प्रश्न अशा विविध विषयांवर आमदारांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. आमदार निलेश राणे यांच्या दीड वर्षाच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लागले असून, कुडाळ- मालवण मतदारसंघाची विकासात्मकदृष्ट्या योग्य दिशेने वाटचाल सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या विकासप्रक्रियेत महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, आपला मतदारसंघ राज्यातील २८८ मतदारसंघांपैकी एक असून त्याकडे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांचे विशेष लक्ष वेधून घेण्याचे श्रेय आमदार निलेश राणे यांना जाते, असे जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी नमूद केले.
खासदार तथा कोकणचे भाग्यविधाते नारायणराव राणे यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद, तसेच कार्यसम्राट पालकमंत्री नितेश राणे यांची सक्षम साथ आमदार निलेश राणे यांना लाभत आहे. त्यामुळे आगामी काळात कुडाळ-मालवण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास निश्चितपणे वेगाने होईल, असा विश्वासही जिल्हा परिषद सदस्य रुपेश कानडे यांनी व्यक्त केला.
