सिंधुदुर्गनगरी:
जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी नदीपात्रातील गाळ काढण्याची कामे अधिक गतिमान करून उर्वरित कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
बैठकीत कार्यकारी अभियंता अमोल चोपडे यांनी माहिती देताना सांगितले की, मंजूर कामांअंतर्गत एकूण ८ लाख ४६ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत ६ लाख १३ हजार घनमीटर गाळ काढण्यात यश आले असून उर्वरित गाळ येत्या १० दिवसांत काढण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उर्वरित कामांसाठी अधिक यंत्रणा उपलब्ध करून गाळ काढण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच या बैठकीत तेरेखोल नदीपात्रातील गाळ जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तातडीने काढण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागास तत्काळ सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सन २०२५-२६ या वर्षासाठी जिल्हा नियोजन विभागामार्फत नदीपात्र गाळ काढण्याच्या एकूण १७ कामांना मान्यता देण्यात आली होती. त्यापैकी ५ कामे जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत तर १२ कामे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहेत. या कामांपैकी बहुतांश कामे पूर्णत्वास आली असून जिल्ह्यातील नदीपात्र गाळमुक्त करण्याच्या मोहिमेला मोठे यश मिळत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
तसेच आगामी सन २०२६-२७ या वर्षासाठी नदीपात्र गाळ काढण्याच्या नवीन प्रस्तावांचे अंदाजपत्रक तातडीने जिल्हा नियोजन विभागाकडे सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या. जिल्ह्यातील नदीपात्रांमधील गाळ काढण्याच्या या मोहिमेमुळे पूरस्थिती नियंत्रणास मदत होणार असून जलप्रवाह सुरळीत राहण्यासही मोठा हातभार लागणार आहे.
या बैठकीला कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, तिलारी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, यांत्रिकी विभागाचे उप अभियंता श्री. चौगुले, नाम फाऊंडेशनचे दिग्विजय पाटील, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
