जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते कणकवली येथे बीपीएचयू युनिटच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी बीपीएचयू ठरणार महत्त्वाचा दुवा

सिंधुदुर्गनगरी:
राष्ट्रीय आरोग्यअभियानांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत कणकवली येथे बांधण्यात आलेल्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (BPHU)च्या नूतन इमारतीचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. ग्रामीण व तालुकास्तरीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही सुविधा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पायाभूत सुविधा विकास कक्षामार्फत उभारण्यात आलेल्या या इमारतीचे क्षेत्रफळ २ हजार ६८ चौ. फूट आहे. १५ व्या वित्त आयोगांतर्गत या कामासाठी ५० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. कणकवली तालुक्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या नियोजन, देखरेख आणि समन्वयासाठी ही इमारत महत्त्वाची पायाभूत सुविधा म्हणून उपलब्ध झाली आहे.

बीपीएचयूच्या माध्यमातून तालुक्यातील आरोग्यविषयक माहितीचे संकलन, विश्लेषण व निरीक्षण अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. विविध आजारांचे सर्वेक्षण, रोगप्रसाराची संभाव्य परिस्थिती ओळखणे, उद्रेकाच्या वेळी तातडीने प्रतिसाद देणे, माता-बाल आरोग्य, लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील कार्यक्रमांचे निरीक्षण तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यास या युनिटची मदत होणार आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील आरोग्यविषयक निर्णय अधिक अचूक माहितीच्या आधारे घेणे आणि आवश्यक त्या ठिकाणी आरोग्यसेवा तत्काळ पोहोचविणे शक्य होणार आहे.

या युनिटमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये सुरू असलेल्या आरोग्य कार्यक्रमांमध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल. विशेषतः साथीचे आजार, हंगामी आजार किंवा आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीत तालुकास्तरावर माहिती, निरीक्षण आणि प्रतिसादाची यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कणकवली तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला या सुविधेमुळे बळकटी मिळणार आहे.

लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.), जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य समिती सभापती निलेश राजक, समाजकल्याण समिती सभापती डॉ. कलिना तांबे, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, पंचायत समिती कणकवली सभापती हर्षदा वाळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्यासह लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top