भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी बनवली गो-कार्ट.

कोईमतूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत करणार कोकणाचे प्रतिनिधित्व..

सावंतवाडी प्रतिनिधी

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी कौशल्य, नवकल्पकता आणि टीमवर्कचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत राष्ट्रीय स्तरावरील “गो कार्ट डिझाईन चॅलेंज” स्पर्धेसाठी आकर्षक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी गो-कार्ट तयार केली आहे. कोईमतूर येथे 20 ते 24 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तेराव्या राष्ट्रीय गो-कार्ट स्पर्धेत ही कार सहभागी होणार आहे.

संस्थेचे सचिव संजीव देसाई यांच्या हस्ते आज या गो-कार्टचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, सर्व विभागप्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना देसाई म्हणाले की अशा प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज, टीमवर्क, बजेट मॅनेजमेंट तसेच इंडस्ट्री एक्स्पोजर यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांचा अनुभव मिळतो. डॉ. रमण बाणे व गजानन भोसले यांनीही विद्यार्थ्यांच्या या प्रोजेक्टचे कौतुक करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

कॉलेजच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व कॉम्प्युटर विभागातील एकूण १८ विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प साकार करण्यासाठी परिश्रम घेतले. गौरांग तुळसुलकर, हर्ष मेस्त्री तसेच डिग्री व डिप्लोमा विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी समन्वयातून हा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला. या उपक्रमासाठी कॉलेजचे माजी विद्यार्थी कपिल मळगावकर आणि मनीष मणेरकर यांचे सहकार्य लाभले. मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता मिलिंद देसाई यांनी हा प्रोजेक्ट निवडण्यामागचा उद्देश, नियोजन आणि संपूर्ण प्रवास उलगडून सांगितला. प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून डिप्लोमा विभागाचे मनीष घाटगे व डिग्री विभागाचे आशिष सुवारे यांनी जबाबदारी सांभाळली.

या प्रकल्पासाठी भोसले नॉलेज सिटीसह मिन्को, थर्मल इन्स्ट्रुमेंट्स, सॉफ्टमस्क, मॅपसन्स आणि डेझॉल सिस्टीम सॉलिड वर्क्स या आस्थापनांनी आर्थिक सहाय्य व प्रायोजकत्व दिले. उपस्थित विद्यार्थ्यांच्या साक्षीने गो-कार्टचे थरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल करण्याचा निर्धार यावेळी विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top