सावंतवाडी रेल्वे स्थानकाला ‘लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस’ नाव; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी…

सावंतवाडी:
सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार आणि ज्येष्ठ नेते कै. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून आता ‘लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस’ असे करण्यास राज्य मंत्रिमंडळाने अधिकृत मंजुरी दिली असून यामुळे कोकणातील जनतेची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी अखेर मार्गी लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, ज्यामध्ये सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या प्रस्तावाला एकमुखाने मान्यता देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता नामकरणाबाबतचा हा अधिकृत प्रस्ताव पुढील अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे म्हणजेच रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
देशाचे माजी रेल्वेमंत्री स्व. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेच्या उभारणीत आणि ती स्वप्नातून प्रत्यक्षात आणण्यात अत्यंत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या याच ऐतिहासिक योगदानाचा गौरव म्हणून सावंतवाडी टर्मिनसला त्यांचे नाव देण्याची मागणी कोकणवासीयांकडून सातत्याने केली जात होती. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात आनंदाचे वातावरण पसरले असून, अनेक वर्षांनंतर एका ज्येष्ठ नेत्याच्या कार्याचा खऱ्या अर्थाने सन्मान होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top