सावंतवाडी:
मळगाव(ता. सावंतवाडी)येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशोत्सव सजावट स्पर्धेत भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी यांनी साकारलेला ‘मराठी शाळा वाचवा’ हा सामाजिक संदेश देणारा देखावा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. सध्या मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न चर्चेत असताना या विषयावर आधारित देखाव्याने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरेसोबतच सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून करण्यात आला. ‘मराठी शाळा वाचवा’ या विषयावरील देखाव्यातून मराठी माध्यमाच्या शाळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आल्याने हा देखावा मळगाव परिसरात चर्चेचा विषय ठरला.
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या भिकनाथ उर्फ बाब्या गोसावी यांना पांडुरंग राऊळ यांच्या वतीने प्रायोजित ₹७,००१ चे रोख पारितोषिक देण्यात आले. नितेश तेली व दीपक बांदिवडेकर यांनी विभागून द्वितीय क्रमांक मिळविला. दोघांनाही विलास मळगावकर यांच्या वतीने प्रायोजित प्रत्येकी ₹२,५०० चे रोख पारितोषिक देण्यात आले.
निलेश कुडव व प्राची गोसावी यांनी विभागून तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना भिल्लवाडी ग्रुपच्या वतीने प्रायोजित प्रत्येकी ₹१,००१ चे रोख पारितोषिक देण्यात आले.
दरम्यान, द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या नितेश तेली यांनी गणेश सजावटीसाठी संपूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला होता. नैसर्गिक साधनसामग्रीचा कल्पक वापर करून साकारलेली त्यांची सजावट लक्षवेधी ठरली. सजावटीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्पर्धेतील विविध देखाव्यांमधून सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक संदेश देण्यात आल्याने यंदाची गणेशोत्सव सजावट स्पर्धा केवळ सजावटीपुरती मर्यादित न राहता जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली.
