सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत काजू उत्पादकांच्या प्रतिनिधींनी सोमवारी कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची त्यांच्या मालवण येथील ‘निलरत्न’ निवासस्थानी भेट घेतली.
या भेटीत काजू उत्पादनातील अडचणी, घसरते विक्रीदर, उत्पादन खर्चातील वाढ, वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव तसेच काजू बाजारातील स्थानिक व आयात मालाची प्रतवारी आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या प्रश्नांवर लक्षवेधी सूचना मांडावी, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली.
सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, दोडामार्ग तालुका शेतकरी व फळबागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई तसेच खजिनदार आकाश नरसुले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा आमदारांसमोर मांडल्या.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काजू आवक, बाजारभाव, स्थानिक व आयात काजूतील फरक तसेच प्रतवारी यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेतली. विशेषतः लगतच्या गोवा राज्यात काजूसाठी मिळणाऱ्या दरांबाबत त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
शेतकरी प्रतिनिधींनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती लक्षात घेऊन येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सकारात्मक व ठोस लक्षवेधी सूचना मांडण्याचे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
