ॲड.रुजूल पाटणकर;मुलांच्या उज्वल भविष्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा
सावंतवाडी:
मुलांच्या चेहऱ्यावर उमलणारे निरागस हास्य, त्यांच्या बोबड्या बोलांमधून व्यक्त होणारे भावविश्व आणि त्यांच्या चिमुकल्या जगातील प्रत्येक हालचाल ही प्रत्येक पालकासाठी आनंदाची पर्वणी असते. मात्र, काही मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या व विकासाच्या प्रवासात संवाद साधणे, सामाजिक वर्तन, संवेदनशीलता आणि शिकण्याच्या प्रक्रियेत काही वेगळेपणा दिसून येतो. अशा बालकांना योग्य वेळी योग्य आधार, शास्त्रशुद्ध उपचार आणि अत्यंत संवेदनशील मार्गदर्शन मिळणे काळाची गरज असते. याच सामाजिक बांधिलकीतून आणि संवेदनशील जाणिवेतून स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे चेअरमन ॲड. रुजूल पाटणकर यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, कोलगाव येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या संकुलात ऑटिझम व संबंधित विकासात्मक अडचणी असलेल्या मुलांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त थेरपी लॅब उभारण्यात आली आहे.
या नूतन सुविधेच्या माध्यमातून गरजू मुलांना अनुभवी व तज्ज्ञ थेरपिस्टच्या थेट मार्गदर्शनाखाली शास्त्रशुद्ध पद्धतीने थेरपी उपलब्ध करून दिली जात आहे. ग्रामीण भागातील पालकांना अशा उपचारांसाठी शहरांकडे धाव घ्यावी लागू नये आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला वेळीच योग्य दिशा मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल आणि स्वावलंबी भविष्यासाठी या अद्ययावत सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे कळकळीचे आवाहन ॲड. रुजूल पाटणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी बोलताना ॲड. पाटणकर यांनी ऑटिझमविषयी समाजात पसरलेल्या विविध गैरसमजुतींवर परखड प्रकाश टाकला. ऑटिझम हा कोणताही संसर्गजन्य आजार नसून, तो मेंदूच्या विकासाशी संबंधित एक न्यूरो-विकसनात्मक स्थिती (Neuro-developmental condition) आहे, हे स्पष्ट करत त्यांनी पालकांना सजग राहण्याचे आवाहन केले. या स्थितीची लक्षणे बालपणातच दिसून येतात; मात्र प्रत्येक बालकामध्ये त्याचे स्वरूप आणि तीव्रता ही पूर्णपणे भिन्न असते. त्यामुळे कोणत्याही मुलाची इतरांशी तुलना न करता, प्रत्येक मुलाकडे त्याच्या वैयक्तिक गरजा, संवेदनशीलता आणि उपजत क्षमतांचा आदर करून पाहणे व त्यानुसारच उपचार देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले
