शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी व्यापक मोहीम राबवा; जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग:
जिल्ह्यातील युवक, युवती आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्यासाठी तसेच समाजामध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी नशामुक्ती अभियान अधिक प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालये आणि गावे व्यसनमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन त्याअनुषंगाने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीमध्ये नशामुक्त भारत अभियान तसेच मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनतेला प्रतिबंध करणे, शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती वाढविणे, संशयास्पद ठिकाणांची तपासणी करणे आणि व्यसनाधीन व्यक्तींना उपचार व पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, आरोग्य विभागाचे अधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक तसेच समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

विद्यार्थी आणि युवक हे देशाचे भविष्य असून त्यांना अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर ठेवणे ही सर्व संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या जनजागृती आणि प्रतिबंधात्मक तपासणी मोहिमेचा विस्तार आता महाविद्यालयांमध्येही करण्यात येणार आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये व्यसनमुक्तीविषयक मार्गदर्शन, समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्यसनांच्या संभाव्य धोक्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि पोलीस विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देशही देण्यात आले. अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील कामाचा नियमित आढावा घेऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हास्तरीय बैठकीत सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

समाजातील प्रत्येक घटकाने योगदान द्यावे – पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर

अमली पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनतेला प्रतिबंध करण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणांच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, युवक मंडळे आणि नागरिक यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले. युवक आणि विद्यार्थ्यांना व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यासाठी सातत्यपूर्ण जनजागृती करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांनी मुलांच्या वर्तनातील बदलांकडे संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीने व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top