माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

सिंधुदुर्ग:
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्त्याखालील सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक आणि त्यांची अनाथ व अवलंबित पाल्ये यांच्यासाठी कल्याणकारी निधीतून शैक्षणिक व पुनर्वसनाच्या विविध प्रकारच्या आर्थिक मदती दिल्या जातात.
याच अनुषंगाने, सावंतवाडी तालुक्यातील दाणोली येथील माजी सैनिक सखाराम जगन्नाथ सावंत यांची मुलगी सुचिता ही शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये रशिया येथील ‘केमेरोव्हो स्टेट युनिव्हर्सिटी’ (Kemerovo State University) येथे एम.बी.बी.एस. च्या दुसऱ्या वर्षात (MBBS-IInd) शिक्षण घेत आहे. या परदेश शिक्षणासाठी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यावतीने कल्याणकारी निधी योजनेतून मंजूर झालेला 1 लाख रुपयांचा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या हस्ते माजी सैनिक सखाराम सावंत यांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लक्ष्मण कोळी व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्व पात्र आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांनी आणि आश्रितांनी शासनाच्या अशा विविध शैक्षणिक, स्वयंरोजगार व पुनर्वसन कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा. योजनांच्या अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या 02362-228820 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top