नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळणार पारंपरिक गंजिफा चित्रशैलीचे विशेष प्रशिक्षण
सावंतवाडी:
पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आकाशकंदील महोत्सवाचे बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा चित्रशैलीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यानिमित्त विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी पुढाकार घेतला आहे.
आधुनिक कलेसोबतच विद्यार्थ्यांना पारंपरिक लोककला आणि चित्रशैलीची ओळख व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष श्रद्धा भोसले स्वतः गंजिफा चित्रकलेचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबत या क्षेत्रातील अनुभवी कलाकारही प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत.
आकाशकंदील प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. नवीन कला आत्मसात करताना आपल्या पारंपरिक लोककलांचा वारसाही जपणे तितकेच आवश्यक आहे. जुन्या कलापरंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हे प्रत्येक कलाकाराचे कर्तव्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
सावंतवाडी संस्थानच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभलेल्या गंजिफा चित्रशैलीला नवसंजीवनी देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून या पारंपरिक कलेचे बारकावे शिकण्याची संधी मिळणार असल्याने कला क्षेत्रातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
यावेळी संस्थाध्यक्ष रमेश भाट, श्याम भाट, प्रकाश मसूरकर, गोविंद बांदेकर, अनुराधा परब, नकुल परसेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
