राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत गणेश नाईक यांचा तृतीय क्रमांक

सिंधुदुर्ग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२५-२६ अंतर्गत प्राथमिक गटातील पूर्व माध्यमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी) विभागात गणेश भिकाजी नाईक यांनी ‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या नवोपक्रमाच्या माध्यमातून तृतीय क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
राज्यातील शिक्षकांच्या अध्यापनात नाविन्यता वाढवणे, शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी सृजनशील उपक्रमांना प्रोत्साहन देणे तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नवे प्रयोग पुढे आणणे हा या नवोपक्रम स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे.
‘इतिहासाची साधने – अनुभवातून ज्ञानाकडे’ या उपक्रमात विद्यार्थ्यांना इतिहासातील साधने प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण, प्रात्यक्षिके, प्रकल्पकार्य व चर्चासत्रांद्वारे समजावून सांगण्यात आली. पारंपरिक पाठांतराऐवजी अनुभवाधारित व कृतीशील शिक्षणपद्धती वापरल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास विषयाबद्दल रुची निर्माण झाली.
या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, विश्लेषणात्मक विचारशक्ती आणि विषयाची समज वाढल्याचे दिसून आले.
गणेश भिकाजी नाईक यांचे सलग तिसऱ्या वर्षी या स्पर्धेतील यश असून, या यशाबद्दल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग चे प्राचार्य राजेंद्र कांबळे, मार्गदर्शक डॉ संदिप पवार, शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या कार्यामुळे शाळेचा व जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top