मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा ‘प्रि – प्रायमरी ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात.

मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांच्यासह प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित आणि सन्माननीय अतिथी ऑलिंका फर्नांडिस यांची मान्यवर उपस्थिती.

मालवण प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मधल्या सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा ‘प्री – प्रायमरी ग्रॅज्युएशन डे’ समारंभ उत्साहात संपन्न झाला. शनिवारी, ७ मार्च २०२६ ला आयोजित ह्या कार्यक्रमाची थीम तथा संकल्पना ‘ABC’s to big dreams’ अशी होती. यावेळी मंचावर रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणचे मुख्याध्यापक रेवरंड फादर ऑल्विन गोन्साल्वीस, प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित आणि सन्माननीय अतिथी ऑलिंका फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित आणि ऑलिंका फर्नांडिस यांचा परिचय करून त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देत सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. तसेच सिनियर केजीच्या विद्यार्थ्याने उपस्थित मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी नृत्य, गाणी, नाट्य, संभाषण, कथा तसेच प्रहसन असे विविध कार्यक्रम केले.

यावेळी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित यांनी प्रशाला ह्या घटकाचे त्यांच्या जीवनातील महत्व विशेष अधोरेखीत केले. त्यांनी सांगितले की, प्रशाला जबाबदार बनवते आणि जबाबदार नागरिकत्व ही सर्वोच्च पदवी तथा सर्वोच्च सन्मान आहे. जीवनात स्वतः ला अभिमान वाटेल असे करण्यासोबतच शाळेला अभिमान वाटावा असे कार्य करावे असे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत व समाजात वावरताना कायदे व नियमांचे पालन करावे असेही विशेष आवाहन केले. मुलांनी त्यांचा प्रशालेतील वेळ हा भरभरून अनुभवावा असेही त्यांनी सांगितले. पालकांनी त्यांच्या अपेक्षा व मुलांचे शैक्षणिक जगतात नुकतेच झालेले आगमन अशा गोष्टी ध्यानात ठेवून मुलांशी संवाद साधायचेही विशेष आवाहन प्रमुख पाहुणे सहिष्णू पंडित यांनी केले.

यावेळी सन्माननीय अतिथी ऑलिंका फर्नांडिस यांनी, शिक्षक व पालकांच्या लाभलेल्या योगदानाबद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पालकांनी पाल्याला वेळोवेळी प्रोत्साहित करावे असे सांगितले.

कार्यक्रमाच्या समारोपाला सिनियर केजीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘पदवी प्रमाणपत्र’ देऊन गौरवण्यात आले. सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या वतीने छोट्या भाषणाद्वारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका गाॅरेटी फर्नांडिस यांनी केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहसूत्रसंलन केले आणि शिक्षिका मारिया फर्नांडिस यांनी आभार प्रदर्शन केले.

ह्या समारंभात विद्यार्थी विद्यार्थीनींच्या पालकांनी केजीच्या मुलांसोबत विशेष नृत्याचे सादरीकरण केले. तसेच आशादीप नर्सरीच्या मुलांनी भाव नृत्य सादर केले. प्रमाणपत्र वितरणानंतर प्रशालेतील पहिलीच्या मुलांनी केजीच्या मुलांचे पुढिल इयत्तेत ‘स्वागत नृत्याने’ सदिच्छा स्वागत केले.

यावेळी ज्युनियर केजी शिक्षिकांसह प्रशालेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

रोझरी इंग्लिश स्कूल, मालवण प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या ह्या कार्यक्रमाची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली असून प्रमाणपत्र प्राप्त सर्व विद्यार्थी विद्यार्थीनींच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top