बांदा प्रतिनिधी
येथील नुतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली हायस्कूलमध्ये माजी शालेय शिक्षण मंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवस सप्ताहाचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे आणि त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री, रेनकोट आणि दप्तरे यांसारख्या आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना तालुकाप्रमुख बबन राणे भारावून गेले होते. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील एक आठवण सांगताना
सांगितले की, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा आमच्या गुरुजनांनी आम्हाला एक मोलाचा सल्ला दिला होता. तुम्ही मोठे झाल्यावर आपल्या शाळेला आणि तिथल्या मुलांना कधीच विसरू नका, नेहमी प्रशालेकडे वळून पहा, असे शिक्षक म्हणाले होते. गुरुजींच्या याच शब्दांना स्मरून मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत असे सामाजिक उपक्रम करत राहीन, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच विद्यार्थी हेच देशाचे भविष्य असल्याने त्यांनी जिद्दीने अभ्यास करावा, दर्जेदार शिक्षण घेऊन मोठे व्हावे आणि आयुष्यात यशस्वी व्हावे, असा संदेशही त्यांनी दिला. आपले नेते आमदार दीपक केसरकर यांनी नेहमी जनतेची सेवा करण्याची शिकवण दिली असून त्यानुसारच आपले सामाजिक कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक संजय शेवाळे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली, ज्यामध्ये त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्या सावंत यांनी केले, तर उपस्थित सर्वांचे आभार सहशिक्षक दिगंबर मोर्ये यांनी मानले. या साहित्या वाटपामुळे इन्सुली हायस्कूलचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये कमालीचा आनंदाचा माहोल पाहायला मिळाला. या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्यासोबत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सावंत, सरपंच तात्या वेंगुर्लेकर, माजी सरपंच नाना पेडणेकर, संस्था सचिव गुरुनाथ पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते बापू कोठावळे, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, संचालक आपा आमडोसकर, मयुर चराटकर आणि प्रवीण मुळीक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
