सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचे बिगुल वाजले;राजकीय मोर्चेबांधणीला वेग

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राची शिखर
संस्था आणि ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी अखेर सुरू झाली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रारूप मतदार यादी तयार करण्याचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, पात्र संस्थांना आपल्या प्रतिनिधींचे ठराव १ ते ३० सप्टेंबर दरम्यान सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत येत्या डिसेंबर महिन्यात संपत असल्याने, या घोषणेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

मागील निवडणुकीत भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या महायुतीने बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. मात्र, आता नव्या पंचवार्षिक निवडणुकीचे वेध लागल्याने सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी युती आणि बँकेवर पुन्हा कब्जा मिळवण्यासाठी विरोधक अशी थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. जिल्हा बँकेचे नेटवर्क थेट गावपातळीवरील शेतकरी, विकास सोसायट्या आणि विविध कार्यकारी संस्थांशी जोडलेले असल्याने या निवडणुकीला जिल्ह्याच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
निवडणूक प्रक्रियेसाठी कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक आदिनाथ दगडे यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत सभासद असलेल्या प्राथमिक सहकारी संस्था, ट्रस्ट व इतर पात्र संस्थांनी आपले प्रतिनिधी ठराव चार प्रतींमध्ये संबंधित तालुक्याच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात मुदतीत जमा करावेत, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे यांनी केले आहे. ठराव सादर करण्याच्या या पहिल्याच टप्प्यापासून आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आणि सहकारातील वजनदार नेत्यांनी आपली ताकद पणाला लावून मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top