महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून अभिवादन

सिंधुदुर्ग:
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, स्वच्छता आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश देत देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर नेले. त्यांच्या विचारांची आजही समाजाला प्रेरणा मिळत असून, स्वच्छता, अहिंसा आणि सामाजिक ऐक्याची मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

लालबहादूर शास्त्री यांनी साधेपणा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श देशासमोर ठेवला. ‘जय जवान, जय किसान’ हा त्यांचा संदेश देशाच्या सुरक्षेसोबतच अन्नदाता शेतकऱ्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी केलेले कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन प्रशासनातील प्रत्येक घटकाने प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि जनसेवेच्या भावनेने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार निलेश कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top