जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे वेत्ये येथे श्रमदान
सिंधुदुर्ग:
सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची एक प्रभावी चळवळ उभी राहिली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत वेत्ये येथे लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले असून, या उपक्रमामुळे अवघ्या काही दिवसांतच परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या श्रमदान मोहिमेत शालेय विद्यार्थी, ग्रामस्थांपासून ते थेट उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सहभागी होत एक आदर्श निर्माण केला आहे.
वेत्ये गावातील विविध वनराई बंधाऱ्यांचे पूजन यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे आणि तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, गटविकास अधिकारी निलेश जाधव, वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे, ग्रामविकास अधिकारी स्वाती कदम यांनी स्वतः उपस्थित राहून ग्रामस्थांसोबत श्रमदानात सहभाग घेतला. तसेच सरपंच, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या जोशामध्ये या मोहिमेला हातभार लावला. बंधारे बांधल्यानंतर अवघ्या एक दिवसांतच बाजूच्या विहिरींमधील पाणीपातळी वाढल्याचे ग्रामस्थांनी आनंदाने सांगितले.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात उद्भवलेली टंचाईची समस्या सोडवण्यासाठी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ आणि ‘बंधारे बांधणे’ ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रशासन आणि नागरिक एकत्र येऊन या दुष्काळमुक्तीच्या लढ्याला यशस्वी तोंड देत आहेत. यापुढे पाझर तलाव निर्मिती आणि दुरुस्तीसारख्या मोठ्या तांत्रिक उपाययोजनाही हाती घेतल्या जाणार आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आणि ‘ट्रिगर १’ अंतर्गत सुरू झालेल्या या जलसंवर्धन मोहिमेची माहिती दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आतापर्यंत १,४७५ बंधारे घातले असून, जिल्ह्यात ५,००० बचत गटांमार्फत बंधारे घालण्याचे मोठे चॅलेंज स्वीकारले आहे. सर्व जिल्हावासीयांच्या सहकार्याने प्रशासनाने ठरवलेले उद्दिष्ठ १०,००० च्याही पुढे नेऊन आपण या संकटावर निश्चितच विजय मिळवू.
गावातील ग्रामपंचायत सदस्य सुनील गावडे यांनी मोहिमेमागील महिलांच्या योगदानावर प्रकाश टाकला. महिला ग्रामसंघाच्या साहाय्याने प्रत्येक वॉर्डमध्ये बंधारे बांधण्याची मोहीम राबवली जात आहे. महिलांनी घातलेल्या पहिल्याच बंधाऱ्यामुळे एका विहिरीतील पाण्याची पातळी एकाच रात्रीत तब्बल तीन फुटांनी वाढल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रशासकीय अधिकारी व तहसीलदारांचे वेळोवेळचे मार्गदर्शन लाभत असून, भूजल पातळी कायम टिकवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांचे नियोजन वेगाने सुरू आहे. जलसंवर्धनाचा हा संदेश सर्वत्र पसरत असून, या लोकचळवळीमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी वेत्ये गावाचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी एक दीपस्तंभ ठरत आहे.
