प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार; पात्र महिलांना ११ हजार रुपयांपर्यंत लाभ:मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर

शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमातून योजनेची जनजागृती

सिंधुदुर्ग:
गरोदर महिला आणि स्तनदा मातांचे आरोग्य सुधारण्यासोबतच त्यांना पोषक आहारासाठी आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत पात्र महिलांना पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये, तर दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजार रुपये, अशी एकूण ११ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जाते. शारदीय नवरात्री उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘नवदुर्गा’ जनजागृती उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी या योजनेची माहिती देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी या उपक्रमातून प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे महत्त्व स्पष्ट केले आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा पांढरा रंग हा शांततेचे प्रतीक असून, या दिवसाच्या निमित्ताने माता आणि बालकांच्या आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबविण्यात येणारी महत्त्वाची मातृत्व लाभ योजना आहे. १ जानेवारी २०१७ रोजी सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश गरोदरपणात आणि बाळाच्या जन्मानंतर महिलांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे, पोषक आहारासाठी मदत करणे तसेच गरोदरपणात कामावर जाता न आल्यामुळे होणाऱ्या मजुरीच्या नुकसानीची अंशतः भरपाई करणे हा आहे.

पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपयांची मदत

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सुधारित स्वरूपानुसार, पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पात्र महिलेला पाच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दोन हप्त्यांत दिले जाते. यातील पहिला हप्ता तीन हजार रुपयांचा असून, गरोदरपणाची नोंदणी आणि किमान एक प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी पूर्ण केल्यानंतर तो दिला जातो. दुसरा हप्ता दोन हजार रुपयांचा असून, बाळाच्या जन्माची नोंदणी आणि बाळाला प्राथमिक लसीकरणाचा पहिला डोस दिल्यानंतर देण्यात येतो. या आर्थिक सहाय्यामुळे महिलांना गरोदरपणात आवश्यक आरोग्य तपासण्या, पोषण आणि बाळाच्या संगोपनासाठी मदत मिळते.

दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजार रुपये

मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी योजनेच्या विस्तारित स्वरूपात १ एप्रिल २०२२ पासून दुसरे अपत्य मुलगी असल्यास पात्र मातेला सहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य एकरकमी दिले जाते. त्यामुळे पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास सहा हजार रुपये, अशा प्रकारे पात्रतेनुसार एकूण ११ हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते.

अर्जासाठी अंगणवाडी केंद्र किंवा शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक महिलांनी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य केंद्रात संपर्क साधून अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती घेता येते. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित पात्रता आणि आवश्यक अटींची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गरोदर महिला आणि स्तनदा मातांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मार्गदर्शन घ्यावे.

माता आणि बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, महिलांना पोषणासाठी आर्थिक आधार मिळावा आणि मुलींच्या जन्माला प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने प्रधानमंत्री मातृवंदना योजना महत्त्वपूर्ण ठरते. शारदीय नवरात्रीच्या ‘नवदुर्गा’ उपक्रमाच्या माध्यमातून अशा योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पात्र महिलांनी योजनेची माहिती घेऊन लाभासाठी अर्ज करावा, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top