परभणी प्रतिनिधी:
सेलू, जिल्हा परभणी येथील व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे कार्याध्यक्ष बाबासाहेब हेलसकर यांच्या दुर्दैवी निधनाने पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारितेच्या हितासाठी ते संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे कार्यरत होते.
त्यांच्या निधनानंतर व्हॉईस ऑफ मीडिया व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांनी हेलसकर कुटुंबीयांची नुकतीच सांत्वनपर भेट घेतली. या दुःखद प्रसंगी कुटुंबीयांचे सांत्वन करत, व्हॉईस ऑफ मीडिया परिवार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
बाबासाहेब हेलसकर यांनी पत्रकार आणि पत्रकारितेसाठी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने व्हॉईस ऑफ मीडियाने एक समर्पित, सक्रिय आणि सहकाऱ्यांच्या हितासाठी झटणारा कार्यकर्ता गमावला आहे.
बाबासाहेब हेलसकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! हेलसकर कुटुंबीयांच्या दुःखात व्हॉईस ऑफ मीडिया परिवार सहभागी आहे.
