सिंधुदुर्ग:
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गांतील, उच्च शिक्षण घेत असलेल्या; मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. भटक्या जमाती-क (NT-C) प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी या योजनेसाठी वगळण्यात आले आहेत.
या योजनेंतर्गत बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्ग येथे दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमा करावेत.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.
