वाढदिवसाचे औचित्य साधत विशाल परब यांचा सेवाभावाचा अनोखा संकल्प!

दोडामार्ग अन् वेंगुर्ल्यात महाआरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांच्या सेवेसाठी वैकुंठ रथांचे लोकार्पण!

दोडामार्ग:
वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव आणि उत्सव नव्हे, तर समाजाच्या सुख-दुःखात सहभागी होत माणुसकीचे ऋण फेडण्याची संधी! हाच सेवाभाव जपत भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग आणि वेंगुर्ला येथे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन केले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचबरोबर दोन्ही शहरांतील नागरिकांच्या सेवेसाठी वैकुंठ रथांचे लोकार्पण करून परब यांनी सामाजिक बांधिलकीचा एक संवेदनशील आदर्श समाजासमोर ठेवला.

आनंदाच्या क्षणी समाजाचे ऋण फेडण्याची भावना आणि दुःखाच्या प्रसंगी गरजू कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार, या दोन्ही भावनांचा संगम या उपक्रमांतून पाहायला मिळाला. आरोग्यसेवेच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देतानाच, एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो, त्या कठीण प्रसंगी अंत्यसंस्काराशी संबंधित सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या भावनेतून वैकुंठ रथांचे लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे या उपक्रमाला केवळ सामाजिक कार्यक्रमाचे नव्हे, तर माणुसकी जपणाऱ्या सेवाकार्याचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

वेंगुर्ल्यात मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण!

वेंगुर्ला येथे आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष राजन गिरप, युवा नेते विशाल परब आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना गरजेच्या वेळी महत्त्वाची सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल पडले आहे.

दोडामार्गमध्येही सेवाभावी उपक्रमाला सुरुवात

दोडामार्ग येथे आज भाजपा राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर, गोवा राज्य भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर, युवा नेते विशाल परब, नगराध्यक्ष चेतन चव्हाण आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वैकुंठ रथाचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्थानिक पातळीवर महत्त्व अधोरेखित झाले.

वाढदिवसातून समाजसेवेचा संदेश!

महाआरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आरोग्यसेवा आणि वैकुंठ रथांच्या लोकार्पणातून दुःखाच्या प्रसंगी आधार देण्याचा प्रयत्न, अशा दुहेरी सेवाभावी उपक्रमांमुळे विशाल परब यांच्या वाढदिवसाला सामाजिक संवेदनशीलतेची जोड मिळाली. “वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजाच्या उपयोगी आणणे,” हा संदेश या उपक्रमांतून अधोरेखित झाला. नागरिकांच्या आरोग्यापासून ते त्यांच्या कठीण प्रसंगातील गरजांपर्यंत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा प्रयत्न दोडामार्ग आणि वेंगुर्ला परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top